संजीवनीच्या कॅडेट्सनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षण द्यावे; राज्यातील सैनिकी शाळांच्या विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

एस.डी. :
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ब्रास बँड महाअंतिम स्पर्धेत पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बँड पथकाने देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी संजीवनीचे विशेष अभिनंदन करत, “संजीवनीच्या या यशामुळे देशपातळीवर महाराष्ट्राची शान वाढली असून शिस्त, गुणवत्ता आणि राष्ट्रप्रेमाची प्रभावी परंपरा त्यांनी निर्माण केली आहे,” अशा शब्दांत गौरव केला.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री. सुमित कोल्हे यांच्या पुढाकाराने संजीवनीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील मंत्री दादाजी भुसे यांच्या ‘जंजिरा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये राबविण्यात येणारे सैनिकी शिक्षण, नेतृत्व विकास, शिस्त, राष्ट्रभक्ती, व्यक्तिमत्त्व विकास तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध उल्लेखनीय यशस्वी उपक्रमांची माहिती श्री. सुमित कोल्हे यांनी मंत्र्यांना सविस्तर दिली.

यावेळी बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी संजीवनीने केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची मूल्ये रुजविणारे प्रभावी शैक्षणिक मॉडेल उभे केले असल्याचे सांगितले. राष्ट्रीय ब्रास बँड स्पर्धेतील प्रथम क्रमांक ही संजीवनीच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि संस्थेच्या दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षणाचे विविध घटक समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देताना मंत्री भुसे यांनी संजीवनी सैनिकी स्कूलच्या प्रशिक्षित कॅडेट्सनी परिसरातील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना प्राथमिक परेड, सैनिकी शिस्त आणि नेतृत्वाची मूलभूत तत्त्वे शिकवावीत, अशी सूचना केली. या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सूचनेचे स्वागत करत श्री. सुमित कोल्हे यांनी संजीवनीच्या वतीने शासनाच्या या उपक्रमात पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. समाजाभिमुख आणि राष्ट्रहिताच्या उपक्रमांमध्ये संजीवनी नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवत राहील, संजीवनी सैनिकी स्कुल & कॉलेजचे कॅडेट्स जास्तीत जास्त शाळेमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना प्राथमिक परेड, सैनिकी शिस्त आणि नेतृत्वाची मूलभूत तत्त्वे शिकवतील अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

भेटीदरम्यान राज्यातील सैनिकी शाळा चालविताना संस्थांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय, शैक्षणिक व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. यावर मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील सैनिकी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य व सकारात्मक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिस्त, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक मूल्यांवर आधारित शिक्षण संस्कृती विकसित केली असून राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या सातत्यपूर्ण यशामुळे संस्थेने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय ब्रास बँड स्पर्धेतील देशातील प्रथम क्रमांकाची कामगिरी ही त्याच परंपरेतील आणखी एक मानाचा टप्पा मानली जात आहे.

या प्रसंगी संजीवनी सैनिकी स्कूलचे प्राचार्य के. एल. दरेकर , एस.जी.ओ असिफ सर , श्री भास्कर सर (माजी सैनिक) व संस्थेचे इतर अधिकारी उपस्थित होते.