टीम हेलिक्स प्रथम, टीम टेक टायटन्स द्वितीय ; दोन्ही संघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 

कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड, बुद्धिमत्तेला कौशल्याची साथ आणि जिद्दीच्या बळावर संजीवनी अकॅडमी, वैजापूरच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. पुणे येथील एमआयएस इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी येथे झालेल्या ब्लिक्स-ए-थॉन रीजनल झोनल रोबोटिक्स स्पर्धेत टीम हेलिक्सने विजेतेपद, तर टीम टेक टायटन्सने प्रथम उपविजेतेपद पटकावत संजीवनी अकॅडमीचा ‘डबल धमाका’ साकारला. या कामगिरीमुळे दोन्ही संघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ब्लिक्स एज्युकेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अब्बास गबाजीवाला यांच्या पुढाकाराने आणि वर्ल्ड STEM अँड रोबोटिक्स ऑलिम्पियाड (WSRO) यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेत तब्बल ९० संघ सहभागी झाले होते. त्यापैकी प्रिसिजन गटात ३७ संघ होते. रोबोट डिझाईन, कोडिंग, सेन्सरवर आधारित टास्क तसेच रिअल-टाइम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अशा विविध टप्प्यांत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याची कसोटी घेण्यात आली.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करणे

“रोबोटिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर झेप घेणे ही संजीवनी अकॅडमीसाठी अभिमानाची बाब आहे. या यशातून विद्यार्थ्यांची केवळ तांत्रिक क्षमता नव्हे, तर त्यांची कल्पकता, समस्या सोडविण्याची वृत्ती, टीमवर्क आणि आत्मविश्वासही अधोरेखित झाला आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नाही. त्यांना तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, प्रयोगशीलता आणि नव्या संधींची ओळख करून देणे आवश्यक आहे. संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्याच दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या दोन्ही संघांचे मनःपूर्वक अभिनंदन. राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी त्यांना संस्थेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन देण्याची संजीवनीची परंपरा भविष्यातही कायम राहील.”

सुमित दादा कोल्हे
विश्वस्त, संजीवनी रुरल एज्युकेशन  कोपरगाव 

संजीवनी अकॅडमीच्या ३२ विद्यार्थ्यांनी आठ संघांच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये ज्युनिअर ‘स्प्रिंट’ गटातील दोन, तर सिनिअर ‘प्रिसिजन’ गटातील सहा संघांचा समावेश होता. ट्रान्सफॉर्मेशन लीड स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनासह टीम मेंटर्स वैष्णवी तांबे व गायत्री नागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रिसिजन गटाच्या पात्रता फेरीत ३७ पैकी १६ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे, त्यामध्ये संजीवनी अकॅडमीचे तब्बल पाच संघ होते. यापैकी दोन संघांनी उपांत्य फेरीतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत दोन्ही संघांनी सर्वोच्च दोन स्थानांवर बाजी मारत संस्थेच्या तांत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तेची छाप उमटवली. विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स कौशल्यासोबतच टीमवर्क, वेळेचे नियोजन, निर्णयक्षमता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नाविन्यपूर्ण विचारसरणीचे प्रभावी प्रदर्शन केले.

टीम हेलिक्सने प्रथम क्रमांक मिळवित विजेतेपद पटकावले. इशान निलेश खटाळ, अंश निलेश पवार, अर्णव मनोज चव्हाण आणि आदित्य प्रमोल पगारे या विद्यार्थ्यांचा संघात समावेश आहे. संघाला वैष्णवी तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाला गोल्डन ट्रॉफी, चार पदके आणि रोख पारितोषिक देण्यात आले.

टीम टेक टायटन्सने प्रथम उपविजेतेपद मिळविले. पारिक्षित अमोल निर्मळ, यश मधुकर तांबे, वेदांत वैभव पांडे आणि आर्यन शिवाजी पवार हे या संघाचे सदस्य असून गायत्री नागरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. संघाला सिल्व्हर ट्रॉफी, चार सुवर्णपदके आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

विजेत्या दोन्ही संघांचा ओमोटेकचे सहसंस्थापक शेखर जैन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित दादा कोल्हे व संजीवनी अकॅडमीच्या व्यवस्थापकीय संचालिका निकिता कोल्हे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक मोठी कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

या यशामुळे टीम हेलिक्स व टीम टेक टायटन्स यांची ब्लिक्स-ए-थॉन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी पेड्डेम इनडोअर स्टेडियम, मापुसा, गोवा येथे होणार आहे.

या यशाबद्दल संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, व्यवस्थापकीय संचालिका निकिता कोल्हे, नॉन-अकॅडमिक संचालक डी. एन. सांगळे, जी.एस.ओ. असिफ सय्यद, प्राचार्य प्रवीण शेळके व स्वप्निल पाटील यांनी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.