संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये नवागतांचे स्वागत
कोपरगाव: अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची उभारणी होत असल्याने येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत आशादायी ठरणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी  शिक्षण घेत असताना अपयशासाठी इतरांना जबाबदार न धरता आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य यांच्या पंचसूत्रांचा अंगीकार करून शिस्त, संयम, परिश्रम आणि योग्य निर्णय क्षमतेच्या बळावर करिअर घडवावे, असे प्रतिपादन तहसीलदार श्री महेश सावंत यांनी केले.


        संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्नकच्या प्रथम व थेट द्वीतिय वर्षाच्या  नवागतांचे स्वागत ‘संजीवनी तंत्रआरंभ’ या कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमात श्री सावंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन विध्यार्थ्यांना मार्दर्शन  केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी सर्कल ऑफिसर  श्री मच्छिंद्र पोकळे,  प्राचार्य ए. आर. मिरीकर यांचेसह सर्व विभाग प्रमुख व डीन्स मंचावर उपस्थित होते. प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी पाॅलीटेक्निकने स्थापित केलेल्या कीर्तिमानांची माहिती दिली.

                           श्री सावंत पुढे म्हणाले की रामायणात संजीवनी वनस्पतीचे जसे महत्त्व आहे, तसेच पुढील तीन-चार वर्षे ही शिक्षण  संस्था तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी , नवसंजीवनी आणि उर्जा  देणारी ठरणार आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी  कोणताही न्यूनगंड बाळगू नये. संसाधनं कमी असली तरी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळविता येते.


                                 अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री अमित कोल्हे म्हणाले की, दर्जा आणि गुणवत्तेशी कधीही तडजोड करायची नाही, ही संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची दूरदृष्टी होती. हाच विचार अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे जोपासला जात आहे. ते पुढे म्हणाले की, तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी आहे. त्यामुळे दररोज स्वतःला अधिक सक्षम बनवा. प्राध्यापक सांगतील ती प्रत्येक गोष्ट गांभीर्याने करा. असामान्य व्यक्ती वेगळे काही करत नाही, तर प्रत्येक काम उत्कृष्टतेने आणि सातत्याने करते. म्हणून कौशल्य, सातत्य आणि जिज्ञासू वृत्ती जोपासा. संजीवनीमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेलाच नव्हे, तर विध्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासालाही प्राधान्य दिले जाते. विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्या. लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवर नेटवर्क तयार करा. संजीवनीचे 33 हजारांहून अधिक माजी विद्यार्थी ही संस्थेची मोठी ताकद आहे. अनेक माजी विद्यार्थी नामांकित संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असून अनेक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्याशी संपर्क ठेवा, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि उद्योगक्षेत्रासाठी स्वतःला तयार करा..पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. त्या स्वप्नपूर्तीच्या संक्रमण काळात तुम्ही शिक्षण घेत आहात. त्यामुळे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर कौशल्य, नवोपक्रम, संशोधन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधून विकसित भारताचे सक्षम शिल्पकार बनण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.

प्रा. आय. के. सय्यद यांनी सुत्रसंचालन केले तर डाॅ. एस. एम. सोनवणे यांनी आभार मानले