सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेब : विकासाची अखंड वाहती ‘कर्मगंगा’
कोपरगाव : ऐतिहासिक, पौराणिक आणि आध्यात्मिक परंपरेने समृद्ध असलेल्या कोपरगावच्या पवित्र भूमीत सहकाराच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सहकारमहर्षी, माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब होय. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेताना कोपरगावच्या भूमीचे महत्त्वही अधोरेखित होते.
ऋषी-मुनी, संत-महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत बेट भागात गुरु शुक्राचार्यांनी तपश्चर्येतून संजीवनी मंत्राची सिद्धी प्राप्त केल्याची परंपरा आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी श्रमदानातून श्री काशीविश्वनाथ महादेव मंदिर उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. या संतपरंपरेचा प्रभाव स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्यावर स्पष्टपणे दिसून येतो.
स्व. कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विकासाची चळवळ उभी केली. साखर, दूध, शेती आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी मूलभूत बदल घडवून आणत हजारो कुटुंबांच्या जीवनात समृद्धी निर्माण केली. त्यामुळेच त्यांना ‘तालुक्याचा कल्पवृक्ष’ आणि ‘सहकाराचे भगीरथ’ म्हणून ओळखले जाते.
कर्मप्रधान विचारसरणी असलेल्या स्व. कोल्हे यांनी कर्मकांडापेक्षा कार्याला प्राधान्य दिले. जनतेतच ईश्वर पाहत त्यांनी विकासकामांची ‘कर्मरूपी गोदावरी’ अखंड वाहती ठेवली. सतत वाचन हा त्यांचा स्थायीभाव असून त्यातून त्यांनी स्वतःला घडवले आणि कार्यकर्त्यांनाही सक्षम केले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या ‘संजीवनी’ संस्थांनी ग्रामीण भागात शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या.
स्वामी सहजानंदभारती यांचा सहवास लाभल्याने त्यांच्या कार्यात आध्यात्मिक मूल्यांची जोड मिळाली. त्यांच्या स्मरणार्थ ‘सहजानंदनगर’ उभारण्यात आले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या कार्यातही कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समूहाने सातत्याने सहकार्य केले.
शेती, शेतकरी आणि पाणी या विषयांबद्दल स्व. कोल्हे यांना विशेष जिव्हाळा होता. १९५० साली येसगाव ग्रामपंचायतीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी समाजविकासाचा प्रवास सुरू केला आणि तो थेट दिल्लीपर्यंत नेला. शेतकऱ्यांना शिक्षित करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या.
त्यांच्या आयुष्यातील संघर्षही तितकेच महत्त्वाचे होते. खासगी साखर कारखानदारांची मक्तेदारी मोडणे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे, कर्जावरील व्याजदर कमी करणे, सिंचन प्रकल्प उभारणे, सहकारी कारखाने सुरू करणे, ग्रामीण भागात शिक्षणसंस्था निर्माण करणे तसेच अंधश्रद्धांविरुद्ध लढा देणे अशा विविध क्षेत्रांत त्यांनी ठोस भूमिका बजावली. गरज पडल्यास स्वतःच्या पक्षाविरुद्धही जनतेसाठी उभे राहण्याचे धैर्य त्यांनी दाखवले.
स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्य सह्याद्री पर्वताप्रमाणे भव्य आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांची परंपरा आजही त्यांच्या पुढील पिढीतून आणि त्यांनी उभारलेल्या संस्थांमधून जिवंत आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला जात आहे.

