‘संजीवनी’ हा केवळ संस्थांचा समूह नसून एक परिवार आहे – आमदार श्री विवेकभैया कोल्हे
संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या वतीने आमदार श्री विवेकभैया कोल्हे यांचा सत्कार संपन्न
एस.डी. : संजीवनी हा केवळ संस्थांचा समूह नसून एक मोठा परिवार आहे. संजीवनीचे माजी विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच संजीवनी शैक्षणिक संकुलाची खरी आणि यशस्वी ओळख आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार श्री विवेकभैया कोल्हे यांनी केले.
संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित विविध संस्थांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे, चिफ टेक्निकल ऑफिसर श्री विजय नायडू व्यासपीठावर उपस्थित होते. विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य, डीन, रजिस्ट्रार्स, पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी श्री अमित कोल्हे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात सांगितले की, आमदार श्री विवेकभैया कोल्हे यांची मेरीटवर विधान परिषदेवर निवड होणे ही बाब संपूर्ण संजीवनी परिवारासाठी अभिमानाची आहे. संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी युवकांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ दिले. त्याच विचारधारेतून आमदार विवेकभैया कोल्हे यांची आगेकूच सुरू आहे.
आता आमदार कोल्हे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला अधिक उर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भविष्यात त्यांची कारकीर्द राष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी आमदार विवेकभैया कोल्हे म्हणाले की, मला मिळालेले यश हे केवळ माझे वैयक्तिक यश नसून संजीवनी परिवारातील प्रत्येक सदस्याचे यश आहे. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संजीवनीने सातत्याने केले आहे.
स्व. शंकरराव कोल्हे यांची शिक्षण क्षेत्रातील व्याप्ती मोठी होती. तळागाळात शिक्षण पोहोचले पाहिजे, अशी त्यांची नेहमी अपेक्षा होती. त्या अनुषंगाने संजीवनी शिक्षण संस्थेचे कार्य महान आहे. ही संस्था फक्त शिक्षण देणारी नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला दिशा देणारी व त्याच्या क्षमतांना वाव देणारी संस्था आहे.
आज जगभर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले संजीवनीचे माजी विद्यार्थी या संस्थेच्या गुणवत्तेचे आणि संस्कारांचे जिवंत उदाहरण आहेत. शिक्षकांचे योगदान यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. एखादा इंजिनिअर चुकला तर त्याच्या हातून निर्माण होणारे कार्य बाधित होऊ शकते, एखादा डॉक्टर चुकला तर रुग्ण बरा होऊ शकत नाही; परंतु शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. त्यामुळे शिक्षकांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.
माझी निवड विधान परिषदेवर आमदार म्हणून झाली असून कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देण्याची भूमिका मी सभागृहात पार पाडेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री नितिनदादा कोल्हे म्हणाले की, विवेकभैया यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून झालेली निवड ही विकास, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या नेतृत्वाची निवड आहे. युवकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आमदार विवेकभैया कोल्हे यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
“`

