संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे कोपरगावची एकलव्य आदिवासी आश्रम शाळा टाकळी हॅकॅथॉन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीच्या एकलव्य आदिवासी आश्रम शाळा, टाकळी या शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
लीडरशिप फॉर इक्विटी आणि आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी रिसॉर्ट येथे एक दिवसीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राजूर प्रकल्प कार्यालयांतर्गत विविध आश्रम शाळांमधील ११ शिक्षक व ३३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
आश्रम शाळेतील चौथी ते आठवीच्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारसरणी विकसित करणे, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे, संवाद कौशल्य, तर्कशक्ती तसेच स्क्रॅच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ब्लॉक-बेस्ड कोडिंग कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये नमूद करण्यात आलेल्या २१व्या शतकातील कौशल्यांशी हा उपक्रम सुसंगत ठरला.
या विभागातर्फे आयोजित “कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स” प्रशिक्षणात शाळेचे शिक्षक श्री. धनेश मधुकर गायकवाड व मुख्याध्यापिका श्रीमती मीरा व्ही. जोशी यांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांना लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, जवळे बाळेश्वर यांनी प्रथम क्रमांक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, पैठण यांनी द्वितीय क्रमांक तर एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रम शाळा, टाकळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रम शाळेच्या संघात श्रद्धा रामदास पवार,ओंकार संतोष पवार,रोहित भाऊसाहेब पवार (सर्व इ.आठवी) हे विद्यार्थी सहभागी होते. या यशामुळे टाकळी शाळेची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
ही अशीच यशाची दारे जनसामान्यांसाठी खुली व्हावीत आणि विद्यार्थ्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे, या दूरदृष्टीतून संस्थेच्या सर्व शाखा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य करत असल्याचे विजेत्यांचा सत्कार करताना विश्वस्त सुमितदादा कोल्हे यांनी सांगितले.
या यशाबद्दल संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे तसेच नॉन-अकॅडमिक डायरेक्टर श्री. सांगळे सर यांनी विजेत्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट
संस्थेच्या दूरदृष्टीमुळे यश शक्य – धनेश गायकवाड
जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना शिक्षक धनेश मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, “संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे व संस्थेच्या सर्व व्यवस्थापनाचा सातत्यपूर्ण पाठींबा आणि दूरदृष्टी यामुळेच विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत यश मिळवता आले. या यशामागे संस्थेचे मार्गदर्शन, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे सहकार्य मोलाचे आहे.” असे त्यांनी सांगितले.

