संजीवनी सैनिकी स्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश; शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
एस.डी : शैक्षणिक गुणवत्ता, सैनिकी शिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या *संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था संचलित संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोपरगाव* यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेत यंदाही नेत्रदीपक यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या या घवघवीत यशामुळे परिसरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी शाळेचे एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. सैनिकी शिक्षणाबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेतही सातत्याने आघाडीवर राहणाऱ्या संस्थेने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीची प्रचिती दिली आहे.
या परीक्षेत कॅडेट साई विष्णू बोळीज यांनी ९४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कॅडेट वेदांत संदीप खेतमाळस यांनी ९२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कॅडेट पार्थ प्रशांत तळेकर यांनी ९१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
साई-विष्णू-बोळीज
वेदांत-संदिप-खेतमाळस
पार्थ-प्रशांत-तळेकर
विशेष म्हणजे, चालू शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय स्तरावरील *ब्रास बँड स्पर्धेत राष्ट्रीय विजेती* ठरलेल्या शाळेने शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवत संस्थेचा लौकिक अधिक उंचावला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणारे हे गुणवंत विद्यार्थी ब्रास बँड स्पर्धेमध्येही आपल्या शाळेचे नेतृत्व करत होते. त्यामुळे शिस्त, नेतृत्वगुण, सांघिकता आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा उत्कृष्ट मिलाफ या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमितदादा कोल्हे, विश्वस्त श्री. सुमितदादा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य श्री. के. एल. दरेकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमांचेही कौतुक करण्यात आले.
- “संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि पूरक उपक्रमांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. त्यामुळेच दरवर्षी संस्थेचा यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोपरगावमध्ये ज्युनिअर कॉलेजची सुविधा उपलब्ध असून येथे एनडीए, सैनिक पूर्वभरती तसेच सैन्य दलातील विविध शाखांसाठी आवश्यक प्रशिक्षण उच्च शिक्षणाच्या तयारीसोबत दिले जाते. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या स्वप्नातील आदर्श अधिकारी आणि आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत राहू.”- श्री. सुमितदादा कोल्हे विश्वस्त, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी,कोपरगाव.
शिस्त, गुणवत्ता आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा या त्रिसूत्रीवर कार्यरत असलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या या उल्लेखनीय यशामुळे कोपरगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

