CBSE 10 वी निकाल 2026 : यश अकॅडमी, सोनईची उज्ज्वल परंपरा कायम
१०० टक्के निकालासह तनिष्का डाके शाळेत प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचा यशोत्सव
सोनई | प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या 2026 च्या परीक्षेच्या निकालात यश अकॅडमी, सोनईने पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यंदाही विद्यालयाने शंभर टक्के निकालाची अभिमानास्पद नोंद करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाची नवी उंची गाठली आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी तनिष्का वसंत डाके हिने तब्बल 97.4 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून ती यंदाची शाळेची टॉपर ठरली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याशिवाय इतर विद्यार्थ्यांनीही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
अमेय महेश लेंबे याने 96.8 टक्के, जान्हवी महेश खंडागळे हिने 96.4 टक्के, जान्हवी विलास घावटे हिने 96 टक्के, गौरी रामदास दरंदले हिने 95 टक्के, वेदांत दत्तात्रय जयगुडे याने 92.2 टक्के तर सिद्धार्थ योगीनाथ गाडेकर याने 90.4 टक्के गुण मिळवत यशाची परंपरा अधिक भक्कम केली.
या उत्कृष्ट निकालाबद्दल माननीय नामदार शंकरराव गडाख पाटील, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख पाटील, संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे तसेच सहसचिव विनायक देशमुख यांनी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे प्राचार्य शैलेश दरेकर, सुपरवायझर आसिफ शेख तसेच शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला, पालकांच्या सहकार्याला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यालयात राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, नियोजनबद्ध अभ्यासपद्धती आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यश अकॅडमी, सोनईने मागील अनेक वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही गुणवत्तेचा झेंडा उंचावत शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख अधोरेखित केली आहे.

