आदिवासी वस्तीतून मुंबई विमानतळापर्यंतची झेप

एकलव्य आश्रमशाळेच्या सचिन पवारची एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये निवड; संघर्ष, संस्कार आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

एस.डी | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी वस्तीतून शिक्षणाचा प्रवास सुरू करणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याने आता थेट मुंबई विमानतळावर नोकरी मिळवत यशाची नवी भरारी घेतली आहे. संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचालित एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, टाकळी  येथील माजी विद्यार्थी सचिन साईनाथ पवार याची Airports Authority of India अंतर्गत मुंबई एअरपोर्ट येथे Ticket Checker (TC) पदावर निवड झाली असून त्याचे प्रशिक्षण २६ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. या यशामुळे टाकळीसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील आदिवासी वस्तीत राहणारा भिल्ल समाजातील सचिन अत्यंत सामान्य व कष्टकरी कुटुंबातून पुढे आला आहे. आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही शिक्षणाच्या जोरावर मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा त्याला एकलव्य आदिवासी आश्रमशाळेतून मिळाली.

सन २०११-१२ मध्ये सचिनने एकलव्य आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला आणि २०२०-२१ मध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या काळात संस्थापक कै. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या विचारांचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. “कष्टकरी व आदिवासी समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करावीत,” हा संदेश त्याला सातत्याने प्रेरणा देत राहिला.

संस्थेचे अध्यक्ष मा. नितीनदादा कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त सुमितदादा कोल्हे हे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्नशील असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शालेय जीवनापासूनच सचिनला खेळाची विशेष आवड होती. धावणे आणि कबड्डीमध्ये त्याने उल्लेखनीय प्राविण्य मिळवले. पुढे त्याने इयत्ता ११वी व १२वीचे शिक्षण अमोदे येथील आदिवासी आश्रमशाळेत पूर्ण केले. सध्या तो मनमाड येथील महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.

भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगत सचिनने सैन्य भरतीची कठोर तयारी सुरू ठेवली. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचाही सातत्याने अभ्यास करत मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने आज हे यश संपादन केले आहे.

यशाबद्दल बोलताना सचिन पवार म्हणाला,

“शालेय जीवनात मिळालेले संस्कार आणि मा. शंकरराव कोल्हे साहेबांचे विचार सतत प्रेरणा देणारे ठरले. गरीब घरातील मुलांनी मोठे शिक्षण घेऊन चांगल्या पदावर पोहोचावे, आई-वडिलांना सुखी ठेवावे, हा संदेश आम्हाला कायम दिला जायचा. त्यातूनच मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळाली.”

सचिनच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. नितीनदादा कोल्हे व कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सत्कार कार्यक्रमास डायरेक्टर (नॉन अकॅडमिक्स) श्री. डी. एन. सांगळे, मुख्याध्यापक श्री. टकले सर, श्री. लंगोटे सर तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

“आदिवासी वस्तीतून सुरू झालेला सचिन पवार याचा संघर्षमय प्रवास आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण, संस्कार आणि जिद्दीच्या बळावर ग्रामीण व आदिवासी भागातील युवकही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचे सचिन हे जिवंत उदाहरण आहे.मा.स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचे दूरदृष्टीचा हा विजय आहे.”

– सुमित कोल्हे विश्वस्त संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव