मलेशियात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी; कोपरगाव रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत,
सुमितदादा कोल्हे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
वैजापूर | एस.डी.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता आहे, हे पुन्हा एकदा संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित संजीवनी अकॅडमी, वैजापूरच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन (इंडिया) आयोजित १३ व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक नॅशनल गेम्स २०२६-२७ स्पर्धेत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जलतरण व तायक्वांदो या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये २० सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई करत ग्रामीण महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे यश संपादन केले.
३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक येथे झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील गुणवंत खेळाडूंमध्ये संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, शिस्त आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विशेष ठसा उमटविला. या उल्लेखनीय यशामुळे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली असून, वैजापूरसह संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या अभूतपूर्व यशामागे जलतरण प्रशिक्षक सारिका कुहिरे यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, खेळाडूंवरील वैयक्तिक लक्ष, कठोर सराव आणि राष्ट्रीय दर्जाची तयारी यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्यानुसार केलेले नियोजन आणि स्पर्धेपूर्वी घेतलेली मेहनत यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली. क्रीडा शिक्षक तडवी सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी सातत्याने केलेले मार्गदर्शनही या यशाचा महत्त्वाचा आधार ठरला.
राष्ट्रीय स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करून परतलेल्या विद्यार्थ्यांचे कोपरगाव रेल्वे स्थानकावर ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे, कार्यकारी संचालिका सौ. निकिता कोल्हे, श्री पाटील सर, डॉ. मुक्ता शिंदे, पालकवर्ग तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
“ग्रामीण विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर झेप घ्यावी” – सुमितदादा कोल्हे
यावेळी बोलताना विश्वस्त सुमितदादा कोल्हे म्हणाले, “संजीवनीचा उद्देश केवळ गुणवंत विद्यार्थी घडविणे नसून, जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे सक्षम नागरिक तयार करणे हा आहे. ग्रामीण भागात प्रतिभेची कमतरता नाही; योग्य संधी, आधुनिक सुविधा, प्रशिक्षित मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत मिळाल्यास हीच मुले जग जिंकू शकतात. आज विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश ही संजीवनीच्या क्रीडा संस्कृतीची आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पावती आहे. आता मलेशियात भारताचा तिरंगा अधिक उंच फडकवून ते संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
आधुनिक क्रीडा सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण, अनुभवी प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित शैक्षणिक धोरणामुळे संजीवनी अकॅडमीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याची प्रभावी परंपरा निर्माण केली आहे. मलेशियात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेले हे विद्यार्थी संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि क्रीडा संस्कृतीचे यशस्वी उदाहरण ठरत आहेत.
या यशाबद्दल संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, व्यवस्थापकीय विश्वस्त अमितदादा कोल्हे, विश्वस्त सुमितदादा कोल्हे, कार्यकारी संचालिका सौ. निकिता कोल्हे, संचालक (नॉन-अॅकॅडमिक) डी. एन. सांगळे, प्राचार्य शेळके सर यांनी सर्व पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षक सारिका कुहिरे, क्रीडा शिक्षक तडवी सर, पालकवर्ग आणि संपूर्ण क्रीडा विभागाचे अभिनंदन करून मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

