संस्थेच्या प्रयत्नांना यश; विद्यार्थ्यांच्या करिअरची भक्कम सुरुवात

कोपरगाव (प्रतिनिधी): नामांकित औषधनिर्मिती कंपनी इंटस फार्मास्युटिकल्स प्रा. लि. यांनी संजीवनी फार्मसी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची आकर्षक पॅकेजवर निवड केली आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली असून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एम. फार्मसीच्या दिव्येश रमेश म्हात्रे, कृष्णा रामहरी गोरे, झुंबर रामनाथ पोटे, तुषार नवनाथ पाटील, ऋतिक दत्तु काळे, विवेक विष्णू पारखे, यश दिपक कदम तसेच बी. फार्मसीचा अतुल मच्छिंद्र आहेर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अंतिम वर्षाचा निकाल लागण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याने त्यांच्या करिअरची भक्कम पायाभरणी झाली आहे.

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला प्राप्त असलेल्या ऑटोनॉमस दर्जामुळे उद्योगाभिमुख आणि अद्ययावत अभ्यासक्रम राबविणे शक्य झाले आहे. याचाच परिणाम म्हणून येथील विद्यार्थी विविध नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत यश मिळवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालय सातत्याने पुढाकार घेत आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. कार्यकारी विश्वस्त श्री. अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. प्रमोद कडू उपस्थित होते.

संजीवनी संस्थेच्या या यशामुळे परिसरात शिक्षण व रोजगार क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशाच संधी विद्यार्थ्यांना मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांचा नोकरीसाठी निवड झाल्याबध्दल सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.